१९४७ साली भारत स्वाधीन झाला, पण स्वतंत्र झाला नाही. आपली संस्कृती, संपर्क भाषा, पारिभाषिक शब्दावली, वैशिष्ट्ये, ज्ञानपरंपरा इत्यादी विषयांचे भान अजून पाहिजे तसे आले नाही. २०१४ पासून नवजागरणाचा काळ आला आहे. या काळात आपल्या धारणा व विमर्श तपासून एकदा कात टाकून पुन्हा आत्मभान झालेला भारत लवकर उभा करणे हे भारताच्या राष्ट्रीय समाजाचे काम आहे. जे भारताचे केवळ नागरिक आहेत, पण राष्ट्रीय नाहीत ते या कामात अडथळे आणतील. त्यांची उपेक्षा करीत आपल्या कामाची गती वाढवावी लागेल. कोणतीही भारतीय भाषा संपर्क भाषा होऊ शकत नाही. कुठल्याही अखिल भारतीय कार्यक्रमात संवाद व व्याख्यानाचे माध्यम इंग्रजी असते. कोणत्याही भारतीय भाषेचे उच्चारण केले की, विरोधी स्वर ऐकायला येतात. कारण सर्व भारतीय भाषा प्रादेशिक भाषा आहेत. भाषावार प्रांत रचना झाल्यामुळे आपल्या प्रादेशिक भाषेबद्दल टोकाचा पण बेगडी अभिमान निर्माण झाला आहे.
बेगडी अभिमान यासाठी की, अपवाद सोडले तर प्रादेशिक भाषेत शुद्ध बोलणारे वा लिहिणारे सापडत नाहीत. विदेशी भाषांचे मिश्रण केल्याशिवाय बोलणे वा लिहिणे जमत नाही. आपल्या मुलांना प्रादेशिक भाषेच्या माध्यमात शिकवत नाहीत. या अभिनिवेशाचा परिणाम म्हणजे एकही भाषा भारताची संपर्क भाषा झाली नाही. प्रादेशिक भाषा नाही म्हणून कुठल्याही प्रांतात स्वीकार्यता आहे अशी भाषा म्हणजे संस्कृत आहे. ही प्राचीन तर आहेच; पण नित्यनूतन पण आहे. इंग्रजीसारखी भाषा लॅटिन व ग्रीक या प्राचीन भाषांच्या आधारावर आधुनिक काळाला लागणारी शब्दावली तयार करते. ते जमले नाही तर जगातल्या कुठल्याही भाषेचे शब्द उधार घेते. तशी कुठलीच आवश्यकता संस्कृतसाठी नाही. लाखो नवीन शब्द तयार करण्याचे सामथ्र्य संस्कृतमध्ये आहे. या सामथ्र्याचा उपयोग केल्याने सगळ्या भारतीय भाषा पुष्ट होतील. नवीन शिक्षण प्रणालीमध्ये आश्वासन दिले आहे की, सगळे व्यावसायिक पाठ्यक्रम इंग्रजीशिवाय अन्य भारतीय भाषा माध्यमातूनदेखील उपलब्ध राहतील. त्यात सगळ्यात मोठी अडचण पारिभाषिक शब्दावली निर्माण करण्याची आहे. ती अडचण संस्कृत भाषेत शब्दावली निर्माण करण्याने दूर होईल.
संस्कृत ही केवळ कर्मकांडाची भाषा आहे
संस्कृत केवळ कर्मकांडाची भाषा नाही तर वर्तमान काळात त्या भाषेच्या आधारे संशोधन करण्यासाठी ३५ विश्वविद्यालय व आय. आय. टी. सारख्या संस्था प्रवृत्त झाल्या आहेत. या सर्व विश्वविद्यालयात वा जगन्मान्य संस्थांमध्ये भारतीय ज्ञान परंपरा या नावाचे विभाग उघडले गेले आहेत. त्यात संस्कृत ग्रंथांना आधार मानून निरनिराळ्या विषयांवर अनुसंधान सुरू झाले आहे. त्यासाठी संस्कृत प्राध्यापकांची नियुक्ती झाली आहे. खडगपूर आय. आय. टी. मध्ये या विभागात गवेषणा करण्यासाठी जवळ-जवळ २५० विद्याथ्र्यांनी आवेदन केले. इतका उत्साह बघून मार्गदर्शन करण्यासाठी अभियंत्रण विषयाशिवाय तीन संस्कृतचे प्राध्यापक उपलब्ध करण्यात आले आहेत. नागपूर, पुणे, हैदराबाद यांसारख्या महानगरांमध्येदेखील संस्कृतच्या आधाराने संशोधन करून पेटंट मिळविलेले शास्त्रज्ञ आहेत. त्यामुळे संस्कृत ही भाषा उच्च कोटीच्या संशोधनाची भाषा आहे.
संस्कृत भाषा कठीण आहे ?
कुठल्याही भाषेत बोलण्यात सामान्य शब्द असतात. साहित्यिक भाषा नेहमी कठीण असते. ते साहित्य सर्वोत्कृष्ट मानले जाते; ज्यात व्यंजनांचा व अलंकारांचा वापर अधिक असतो. संस्कृत भाषेला हे लागू पडते. संस्कृत बोलणे सोपे आहे. साहित्याची भाषा थोडी कठीण आहे. शास्त्रीय भाषा अजून कठीण. सगळ्या भारतीय भाषा संस्कृतमधून निघाल्या आहेत. म्हणजे संस्कृतच्या या अपभ्रंश भाषा आहेत. म्हणून बोलण्यात अनेक शब्द संस्कृतचेच उपयोगात येतात. हे प्रमाण साहित्यात वाढते. मराठीच्या जुन्या साहित्यात संस्कृत शब्द प्रचुर मात्रेत आहेतच. आधुनिक मराठी साहित्याने देखील संस्कृतची कास सोडलेली नाही. मी मराठी पाचवीत असताना ‘नल-दमयंती आख्यानङ्क नावाचा धडा होता. त्यातील ओळ अशी- ‘टाकी उपानह पदे अति मंद सेवी.’ या ओळीत ‘टाकी’ व ‘सेवी’ ही दोन पदे केवळ मराठी आहेत. बाकी सर्व शब्द संस्कृत आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ हा मराठी टीकाग्रंथ आहे. पण अधिकांश शब्दावली संस्कृत आहे. म्हणून आळंदीला ज्ञानेश्वरीचे अध्ययन करणारे तरुण संस्कृत शिकण्यास प्रवृत्त होतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या एका कवितेला मंगेशकर कुटुंबाने स्वर दिला आहे. त्यामुळे ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे’ हे गीत अनेक मराठी भाषकांना पाठ आहे. त्यातील धृव पदाच्या ओळी पूर्ण संस्कृतमध्ये आहेत. कविता मराठी आहे. म्हणून कोणी मराठीला कठीण म्हणतो का? जो विद्यालयात शिकला पण नाही तोदेखील मराठी बोलतो तसेच संस्कृतचे आहे. बोलणे सोपे आहे, शास्त्रीय ग्रंथ कठीण आहेत. संस्कृत भारतीच्या दिल्ली कार्यालयात एक अनुसूचित जातीचा नोकर आहे. तो शाळेत गेला नाही. पण ऐकून ऐकून धाराप्रवाह संस्कृत बोलतो. वास्तविक जो विषय अपरिचित तो कठीण असतो. एकदा माहिती वा अभ्यास झाला की तोच विषय सोपा वाटतो. विदेशी भाषेपेक्षा संस्कृत शिकणे सोपे आहे, हा सगळ्यांचाच अनुभव आहे. इंग्रजांच्या काळापासून इंग्रजी शिकविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. तथापि, केवळ सहा टक्के भारतीयांना इंग्रजी येते. कारण ही भाषा अपरिचित असल्याने कठीण आहे. त्या तुलनेत संस्कृत सोपी आहे. नित्य उपयोगात येणारे शब्द मित्र, मार्ग, निर्णय, निश्चय, लाभ, हानी, मंदिर, पूजा इत्यादी.
संस्कृत केवळ वर्ग विशेषाची भाषा आहे
संस्कृत सर्व जाती, पंथ, संप्रदाय व लिंगाचे लोक शिकतात. कोणालाच शिकायला आडकाठी नाही. संस्कृत भारतीची घोषणा आहे- ‘संस्कृतं सर्वेषां संस्कृतं सर्वत्र’ भारतात केवळ संस्कृत विश्वविद्यालये १७ आहेत. त्यात सर्व प्रकारचे छात्र व प्राध्यापक आहेत. मुलींची संख्या पुरुषांच्या तुलनेत अधिक आहे. उदाहरण आहे शहडोल नावाच्या मध्यप्रदेशातील नगराचे. तेथील महिला महाविद्यालयात जवळपास ४०० मुली संस्कृत शिकतात. त्यातील अधिसंख्य जनजातीय आहेत. तसेच उदाहरण छत्तीसगड प्रांतातील अंबिकापूर जिल्ह्याचे आहे. त्या जिल्ह्यात गहरा गुरू नावाच्या जनजातीय संताने अनेक संस्कृत विद्यालये व महाविद्यालये सुरू केली. त्यात शिकायला अधिकांश जनजातीय छात्र येतात. शिक्षण संपल्यावर ते सामान्यत: स्वत:च्या खेड्यात राहून भोवतालच्या प्रदेशात पौरोहित्य करतात.
वाल्मीकि रामायणाच्या व भागवताच्या आधाराने कथा करतात. योग विषय जाणतात म्हणून योगाचे वर्ग चालवतात. ज्योतिष जाणतात म्हणून ज्योतिष्याचा व्यवसाय करतात. वास्तुशास्त्र शिकल्याकारणाने वास्तुपरामर्श केंद्र चालवतात. यामुळे त्यांना आपले गाव सोडून नगराकडे पलायन करावे लागत नाही. स्वत:च्या शेतीतून खाण्यापुरते सर्व पिकवतात. वरखर्च संस्कृतमुळे चालतो. पुन्हा संस्कारवान नागरिक असल्याने उत्तम जीवनयापन करतात. याचेच नाव कौशल विकास आहे. संस्कृत ही सर्वांची भाषा आहे. त्या देवतांकडून प्राप्त झालेल्या भाषेला जनभाषा बनवू या. ही संस्कार भाषा आहे. ही भाषा जनसामान्यांना शिकवून सर्वांना सुसंस्कृत करू या. ही ज्ञानभाषा आहे. कोणीही ज्ञानापासून वंचित राहू नये. संस्कृत शिकवून शहाणे करू सकळ जन…!