सखूबाईनं आपल्या कुटुंबाला मृत्यूच्या दाढेतून असं वाचवलं!

अंबरनाथ : मलंगवाडी येथील जकात नका परिसरात बिबट्याने मध्यरात्री एका कुटुंबावर हल्ला चढवला आहे. यावेळी धाडसी पत्नीने बिबट्याचा प्रतिकार करत पती आणि मुलीचे प्राण वाचवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगड परिसरातील जकात नाका भागात पप्प्या बाळ्या पवार हे पत्नी सखू आणि लहान मुलीसह वास्तव्याला आहेत. शुक्रवारी पहाटे हे कुटुंब त्यांच्या झोपडीत झोपलेलं होतं. त्यावेळी अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि पप्या पवार यांच्यावर हल्ला जोरदार हल्ला केला. त्यावेळी झोपेत गोंधळलेल्या पप्याने प्रतिकार केला, परंतु तो अपुरा पडला.

या गोंधळाने जागा झालेल्या सखुबाईने त्वरित मुलीला बाजूला घेत हातात काठी घेऊन बिबट्याचा हिमतीने प्रतिकार केला. बिबट्याला पळवून लावलं. मात्र बिबट्याशी झालेल्या झटापटीत तिचा पती पप्या हा जखमी झाला आहे. यानंतर त्याला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पतीच्या चेहऱ्याला बिबट्याच्या हल्ल्यात जखमा झाल्या असून त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.