सख्या बहिणींचं सख्ख्या भावांशी लग्न; पण छळाला कंटाळल्या अन्… इकडे दोघाही भावांनी केलं दुसरं लग्न

धुळे : दोन सख्ख्या भावांसोबत दोन सख्या बहिणींचा विवाह झाल्याचे सोशल मीडियावर आपण वाचले असलेच, असाच विवाह धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात झाला होता. मात्र, विवाह झाल्यानंतर दोघा भावांनी दोन सख्या बहिणींचा छळ सुरु केला. छळाला कंटाळून दोन्ही बहिणी माहेरी निघून आल्या. मात्र त्यानंतर या दोन्ही भावांनी दुसरा विवाह केल्याची प्रकार समोर आला आहे. याबाबत महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांत दोन गुन्हे दाखल झाले आहे.

पोलीस सूत्रानुसार, देशशिरवाडे येथील दोन्ही बहिणींचा विवाह धुळे तालुक्यातील आर्वी येथील सुनील आणि अनिल सोनवणे या सख्या भावांशी २०१६ मध्ये झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दोघी बहिणींचा छळ सुरू झाला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे दोन्ही बहिणी मुलांना घेऊन साक्री तालुक्यातील देशशिरवाडे येथे माहेरी आल्या. कोरोना काळात त्यांचा सोनवणे कुटुंबियांशी संपर्क झाला नाही. त्यानंतर दोघी बहिणींना गाफील ठेवून सुनील आणि अनिल सोनवणे यांनी दुसरे लग्न करुन घेतले अशी तक्रार पीडित बहिणींनी दिली आहे.

त्यावरुन सुनील संतोष सोनवणे, अनिल संतोष सोनवणे, संतोष जंगलू सोनवणे, कौशल्याबाई संतोष सोनवणे यांच्या विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पीडित दोन्ही बहिणी कोरोना काळात माहेरी होत्या. महिला तक्रार निवारण कक्षात त्यांनी तक्रार दिली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झाला. दोघींच्या पतीने दुसरा विवाह केला असल्याचे त्या सांगत आहे. या प्रकरणी तपास होईल अशी माहिती सपोनि श्रीकृष्ण पारधी यांनी दिली आहे.