सचिन तेंडुलकरने पोलिसात दाखल केला फसवणुकीचा गुन्हा; वाचा काय आहे प्रकरण

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरने फसवणूक प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे गुन्हा दाखल केला आहे. सायबरच्या युगात अनेकांची फसवणूक केल्याच्या घटना दररोज समोर येत असतात. आता अशाच एका प्रकरणात सचिन तेंडुलकरला पोलिस स्टेशनची पायरी चढायला लागली आहे. यामुळे सचिनचे फॅन्स चांगलेच संतापले आहे. मात्र हे प्रकरण नेमकं काय आहे, हे तुम्हाला माहित आहे का?

मुंबई गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आपले नाव, प्रतिमा आणि आवाज वापरून लोकांची फसवणूक होत असल्याचा आरोप सचिन तेंडुलकर यांनी तक्रारीत केला आहे. बनावट जाहिरातींमध्ये दावा केला जात आहे की, सचिन तेंडुलकरचे प्रोडक्ट विकत घेतल्यावर तुम्हाला सचिनची स्वाक्षरी असलेला टी-शर्ट मिळेल. सचिन तेंडुलकरच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिनच्या स्वीय सहाय्यकाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, ५ मे रोजी फेसबुकवर एका तेल कंपनीची जाहिरात पाहिली, ज्यामध्ये तेल कंपनीने सचिन तेंडुलकरचा फोटो वापरला होता आणि त्या उत्पादनाची शिफारस स्वतः सचिन तेंडुलकरने केली होती, असे लिहिले होते. तेंडुलकरच्या पर्सनल असिस्टंटच्या तक्रारीनुसार, इन्स्टाग्रामवरही अशाच प्रकारच्या जाहिराती पाहण्यात आल्या आहेत.

मुंबई क्राइम ब्रँचला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे सचिन तेंडुलकर अशा कोणत्याही उत्पादनाला मान्यता देत नाही. या जाहिरातीत सचिन तेंडुलकरच्या आवाजाचा गैरवापर करण्यात आला आहे, तसेच त्याच्या फोटोंचाही गैरवापर केला जात आहे. गुन्हे शाखेने या प्रकरणी आयपीसीच्या विविध कलम ४२०, ४६५ आणि ५०० नुसार फसवणूक आणि बनावटगिरी आणि आयटी कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.