सणासुदीत सोने राहणार स्वस्त, खरेदीची मिळणार पूर्ण संधी?

रक्षाबंधनाने देशात सणांचा हंगाम सुरू होतो, जो दिवाळीनंतर कार्तिक पौर्णिमेपर्यंत सुरू असतो. यानिमित्ताने सर्व शुभ खरेदीबरोबरच सोन्याची खरेदीही वाढते. अशा परिस्थितीत यंदा सणासुदीच्या काळात सोन्याचे भाव वाढणार की स्वस्त राहणार, जाणून घेऊया.

यंदा सोन्याच्या दरावर दबाव आहे. अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह सातत्याने व्याजदर वाढवत आहे, त्यामुळे डॉलरही मजबूत झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा सोन्याकडे कल कमी झाला असून सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली. शुक्रवारीही आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1920 ते 1980 डॉलर प्रति औंस दरम्यान राहिला.

भारतात सणासुदीला सुरुवात झाली असली तरी सोन्याच्या खरेदीचा मुख्य काळ हा नवरात्र आणि दिवाळी दरम्यानचा मानला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. पण आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतीतील ही वाढ कमजोर होऊ शकते. याचा फायदा ग्राहकांना सोन्याच्या स्वस्त दरात मिळू शकतो.

जगातील इतर चलनांच्या तुलनेत डॉलर सतत मजबूत होत आहे. डॉलर इंडेक्सने सध्या ६ महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया 11 महिन्यांतील नीचांकी पातळीवर गेला आहे. डॉलरमधील या मजबूतीमुळे सोन्याचा भाव ठराविक किमतीच्या मर्यादेतच राहील, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच वेळी, यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर खाली आणण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही, त्यामुळे डॉलरची वाढ कायम राहू शकते.