सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा बोजा; विवंचनेतून तरुण शेतकऱ्याचं धक्कादायक पाऊल

जळगाव । जळगावसह राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. आता अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथील तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरेश ओंकार विटे (वय ४०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून कर्जफेडीच्या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओंकार विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततची नापिकीमुले कर्ज फेडू शकत नाही. डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे दोन ऑक्टोबरला रिगाव शिवारातील शेतात गेले होते. यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले.

दरम्यान अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला. यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्धावस्थेत दिसले. त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले. यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तत्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.