चाळीसगाव । देशभरात नापीक, कर्जबाजरीसह विविध कारणांमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. आता अशीच एक घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. सतत नापिक त्यात वाढणाऱ्या कर्जाचा डोंगर या विवंचनेतून शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. वाल्मीक पोपट पाटील (वय ४१) असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत असे की, मेहुणबारे येथील रहिवासी वाल्मीक पोपट पाटील यांची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांना शेतातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ते प्रचंड आर्थिक विवंचनेत होते. सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावरबॅंकांसह बचत गटांचे कर्ज झाले होते. शेतात राबराब राबूनही निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पन्न मिळत नसल्याने ते हताश झाले होते. परिस्थिती बदलेल म्हणून त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांची सतत समजूतही घातली जात होती. अखेर वाल्मीक पाटील यांनी १८ फेब्रुवारीला दुपारी घरी कोणी नसताना दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळानंतर त्यांची मुलगी घरी आली असता, तिला वडिलांनी आत्महत्या केल्याचे लक्षात आले. तिने तत्काळ तिचे काका समाधान पाटील यांना सांगितल्यानंतर ते धावत कुटुंबासह घरी आले. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार नरवाडे तपास करीत आहेत.