मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर २१ सप्टेंबर, २०२३ रोजी तातडीने दिल्लीला गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वरिष्ठ कायदेतज्ज्ञांशी अपात्रता कायद्या विषयक चर्चा केली आहे. तसेच सुप्रीम कोर्टाने पुढील आठवड्यात सुनावणीचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात आमदार अपात्रतेबाबत निकाल लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
अपात्र कायदा हा परिस्थितीनुसार बदल होत राहणारा कायदा आहे. सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या याचिकेमधील अजून काय संशोधन करायची गरज आहे, तसेच याबद्दलची अंमलबजावणी करण्याची योग्य पद्धत काय असेल याबद्दल राहुल नार्वेकरांनी तज्ज्ञांसोबत चर्चा केली.
या भेटी संदर्भात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, येत्या आठवड्यात आम्ही सुनावणी करणार असुन प्रक्रियेसंदर्भातील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गरज पडल्यास पक्षप्रमुखांनादेखील बोलवण्यात येईल. तर सध्या हा विषय न्याय प्रविष्ठ असल्यामुळे सुनावणी पुर्वीच याबद्दल बोलणे उचित नसल्याचे त्यांनी सांगितले.
संविधानाने न्यायव्यवस्था, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांना कार्यक्षेत्र आखुन दिले आहे, त्यामुळे त्यांनी काम करणे अपेक्षित आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा संविधानाची शिस्त पाळून योग्य तो निर्णय घ्यावा, असे विधान राहुल नार्वेकरांनी केले आहे.