सत्तासंघर्षाचा पेच; विधानसभा अध्यक्षांचं निवडणूक आयोगाला पत्र

मुंबई : गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टानं राज्यातील संत्तासंघर्षावर निकाल दिला होता. यावेळी न्यायालयाकडून तत्कालीन राज्यपाल आणि निवडणूक आयोगावर ताशेरे ओढण्यात आले होते. त्यानंतर आमदारांच्या अपात्रेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आली. दरम्यान, राज्यातील आमदार अपात्रतेच्या कारवाई संदर्भात हालचालींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केंद्री निवडणूक आयोगाला पत्र पाठविलं आहे.

विधीमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे. या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळ सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे गरज पडल्यास लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपलं म्हणणं आता विधीमंडळासमोर मांडावं लागणार आहे.

आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर अपात्रतेसंदर्भात निर्णय घेतला जाईल. याच पार्श्वभूमीवर आात विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. या पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेची मागणी करण्यात आली आहे.