Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टाचा निकाल आला असून यानुसार शिंदे-फडणवीस सरकार वाचलं आहे. या निकालावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी देखील आपलं मत मांडलं आहे. ‘सरकार बदलायच्या वेळेला घटना होत गेल्या, त्यातून कायद्याचा लोचाच निर्माण झाला, असल्याचे मत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रच्या सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल जाहीर केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की, राज्यातील शिंदे सरकार बचावलं आहे. यावर छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नैतिकता आणि भावनिकेच्या भरात राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. महाराष्ट्रात ठाकरेंच्याबाजुने सहानुभूतीचा लाट निर्माण झाली होती. उद्धव ठाकरेंच्या त्या भाषणामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराष्ट्रात भावनिक वातावरण निर्माण झालं. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचं कौतुकही झालं.
मात्र, आता त्यांचा राजीनाम्याचा निर्णयच त्यांच्या अंगलट आला आहे. केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे नवीन सरकार स्थापन करण्यास आणि मुख्यमंत्री निवडण्यात कायदेशीर अडचण नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे, विद्यमान शिंदे सरकार कायम राहिलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खुर्ची शाबूत आहे.
उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी सरकार परत आणता आलं असतं, असंही निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. भावनेच्या भरात दिलेला राजीनामा कायदेशीर कचाट्यात अडकला आणि शिंदे सरकारला मोठा दिलासा मिळाला.