मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांची समृद्धी झाली. नागपूर ते मुंबई असा ग्रीन कॉरिडॉर असून हा सरळ रस्ता असल्याने पोटातले पाणी देखील हालत नाही, त्यामुळे आम्ही चार तासात नागपूर ते शिर्डी पोचलो, मात्र तुम्ही घाई करू नका, तुम्ही पाच तास घ्या, जीव पण महत्त्वाचा असल्याचे सांगत महामार्गावर सावधानता बाळगून गाडी चालवा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, पहिल्या टप्प्याच्या वेळी विरोधी पक्षाचे आमदार भेटले, आम्हाला खरंच वाटत नाही. आज दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होत आहे. समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या 15 जिल्ह्याचे भविष्य बदलणार आहे. मात्र सद्यस्थितीत अपघातांचे प्रमाण वाढत असून ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लवकर करण्यावर भर आहे. शिवाय हा महामार्ग सरळ असल्यानं चालकाला झपकी येते. त्यामुळे लोकांनी यावर कमी वेगात गाडी चालवावी, असे आवाहन देखील फडणवीस यांनी केले. तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, ट्रान्स हार्बर लिंक, कोस्टल रोड, समृध्दी मार्ग पूर्ण होत असून हे सर्व मार्वेल प्रकल्प आहेत. पुढे नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा महामार्ग करायचे आहेत. नागपूर गोवा मुळे मराठवाड्यात प्रचंड समृद्धी येणार आहे. मुख्यमंत्री स्वतः याबद्दल उत्सुक असतात. ते काम करत असल्याने हा सर्व शक्य होत असल्याचे सांगत आम्ही फाईल वर बसणारे लोक नाहीत, काम करणारे लोक आहोत अशी उपरोधिक टीकाही फडणवीस यांनी केली.
तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील समृद्धी महामार्गाचे कौतुक करताना आम्ही दिलेला शब्द पाळल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, पुढचा शेवटचा टप्पा या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. तसेच आम्ही जाहीरपणे करतो, काही लोकांप्रमाणे घरात बसून चर्चा करत नाहीत. तसेच सत्य काही लपत नसते, आमचे जे काही असते ते मोकळे असते, अशी टीकाही ठाकरे गटावर केली आहे. त्यावेळी मंत्री असताना काही काम नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, तुम्हाला असे काम मिळेल की, दुसरे करायचे गरज नाही, खऱ्या अर्थाने ते शक्य होत आहे. समृद्धी महामार्गासाठी अनेकांनी विरोध केला, विरोध करायला लावला, तेव्हा हे मला फोन करायचे, काही ठिकाणी आमचे पुतळे फास लावलेले असायचे. मात्र शेवटी हा महत्वाचा प्रकल्प मार्गी लागला आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी खूप मेहेनत घेतली असून त्यांचा दूरदर्शीपणा कामी आला. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देखील सर्व अडथळे दूर करून टाकले. काही जण विचारायचे समृद्धी कोणाची झाली, मी म्हणायचो शेतकऱ्यांची झाली. हा रस्ता शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवणारा रस्ता आहे. हा सरळ रस्ता असल्याने पोटातले पाणी देखील हालत नाही, त्यामुळे आम्ही चार तासात नागपूर ते शिर्डी पोचलो, मात्र तुम्ही घाई करू नका, तुम्ही 5 तास घ्या, जीव पण महत्त्वाचा असल्याचे सांगत महामार्गावर सावधानता बाळगून गाडी चालावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.