मुंबई : समृध्दी महामार्गावर खासगी प्रवासी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत शोक व्यक्त केला असून, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. मात्र, यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला समृध्दी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सल्ला दिला आहे.
शरद पवार यांनी एक ट्विट करत या दुर्दैवी अपघातातबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती. अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते, अशी माहिती शरद पवार यांनी ट्विटमधून दिली आहे.