महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेबाबत कायदा केला, पण काही उपयोग नाही, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली आहे. बागेश्वर महाराजाकडे 5 लाख लोकं जातात, अलीकडेच पुण्यात हजारो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या, पण रस्त्याच्या पलीकडे फुलेवाडा, फुलेंची शाळा आहे तिथं नतमस्तक व्हायला कोणी गेलं नाही, अशी खंत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
नाशिक शहरात सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्ती व सत्यशोधक चळवळीचे संशोधक प्रा.हरी नरके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यशोधक समाजाचे 41 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन जेजुरकर लॉन्स नाशिक येथे पार पडले. या अधिवेशनाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी छगन भुजबळ बोलत होते.
सत्यशोधक समाज महात्मा फुलेंच्या प्रेरणेतून सुरु झालं आणि यामुळे धार्मिक किंवा जातीय मुजोरी करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात आळा घालण्याचं काम सत्यशोधक समाजाने केलं. सबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्री दास्य पद्धती, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, महात्मा फुलेंबाबत कोणी चुकीचे बोलले की त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे. अनेक धमक्या आल्या, पण त्याला ते घाबरले नाही. ते गेल्याने फार मोठे नुकसान सत्यशोधक समाजाचे झाले आहे. अलीकडे हरी नरके यांनी चांगले काम केले. मात्र ते गेल्यामुळे पोकळी निर्माण झाली असून त्यांची आठवण काढल्यावर आजही हातपाय गळून जातात.
हळूहळू दलित समाज बराचसा अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या बाहेर आला आहे. मात्र, दुसरीकडे पुण्यात हजारो महिला अथर्वशीर्ष म्हणायला रस्त्यावर दिसल्या, त्याच पलीकडे रस्त्याच्या पलीकडे फुलेवाडा, फुलेंची शाळा आहे, तिथे नतमस्तक व्हायला कोणी गेले नाही, मी काही बोललो तर समाजमाध्यम बडवून काढायला आहेच, जास्तीत जास्त अंधश्रद्धेच्या मागे आपणच जात असल्याचे म्हणाले. महाराष्ट्र सरकारने अंधश्रद्धेबाबत कायदा केला, पण काही उपयोग नाही, अशी खंत भुजबळांनी बोलून दाखवली.