सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, बैलगाडा शर्यतीला परवानगी

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून अवघ्या महाराष्ट्राला प्रतिक्षा असणार्‍या बैलगाडा खेळांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती, तामिळनाडूमधील जल्लीकट्टू आणि कर्नाटकमधील कम्बाला या खेळांना न्यायालयाने परवानगी दिली आहे. अशा खेळांमध्ये प्राण्यांचे हाल होत असल्याचा दावा करणार्‍या याचिका प्राणीमित्र संघटनांनी केल्या होत्या. राज्य सरकारांनी पारित केलेल्या कायद्यांना आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली आहे.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत, तामिळनाडूमध्ये जल्लाकट्टू आणि कर्नाटकमध्ये कम्बाला या खेळांसाठी संबंधित तिन्ही राज्य सरकारांनी त्या त्या राज्यांसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात काही सुधारणा केल्या होत्या. त्यानुसार त्या त्या राज्यांनी या खेळांना मान्यताही दिली होती. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. यासंदर्भात सविस्तर सुनावणी घेऊन डिसेंबरमध्ये हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता. अखेर आज त्यासंदर्भातला निकाल आला आहे.