सर्व्हर डाऊन, नागरिक वैतागलेले; रेशन दुकानदारांनी काढली ई-पॉस मशीनची अंत्ययात्रा

रावेर : स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या हेतूने राज्यभरात ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. परंतु ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत. रावेर येथे आज सोमवारी संतप्त स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशिनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. यावेळी आमदार शिरिष चौधरी यांनीही पाठिंबा देत मागण्याचे निवेदन तहसीलदारांना दिले.

शासनाकडून स्वस्त धान्य दुकानदारास धान्य वाटप करण्यासाठी मिळालेले अत्याधुनिक फाईव्ह जी ई-पॉस मशिन सर्व्हर डाऊनच्या अडचणीमुळे कुचकामी ठरले आहे. सुमारे १० ते १५ दिवसापासून सर्व्हर सतत बंद असल्यामुळे दुकानदारांची वाटप थांबली आहे. त्यामुळे कार्डधारक आणि दु‌कानदार यांच्यामध्ये संघर्षांची परिस्थती निर्माण झाली आहे. वारंवार दुकानाच्या फेन्या मारल्यामुळे कार्डधारक आक्रमक झाले आहे. त्यामुळे दुकानदारांची मानसिक स्थिती खराव झाली आहे. सर्व्हर बंदच्या वारंवार त्रासाला कंटाळून रावेर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी कुचकामी ठरलेल्या ई-पॉस मशिनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा वाजतगाजत काढली.

यांनी दिले निवेदन
रावेर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून दुकानदारांकडील ई पॉस मशीनची अंत्ययात्रा स्वर्गरथातून काढण्यात आली. यात्रेचा समारोप तहसील कार्यालयात झाला.स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचेच्यावतीने आमदार शिरिष चौधरी यांनी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना मागणीचे निवेदन दिले. रावेर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष किशोर पाटील, सल्लागार विठ्ठल पाटील, विलास चौधरी , मोहन महाजन, देविदास महाजन, उपाध्यक्ष दिनेश महाजन, सचिव दिलीप साबळे, सहसचिव निलेश महाजन, सदाशिव झांबरे, बी जी चौधरी, शहराध्यक्ष के एस शिंदे, महेंद्र बगाडे, प्रशांत वाणी, गोपाळ पाटील, सुधाकर पाटील, दुर्गादास चौधरी, भुषण सुरवाडकर यांचे सह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या आहेत मागण्या
इंटरनेट सेवा + सर्व्हर प्रश्न कायम स्वरुपी सोडवण्यांत यावा. धान्य आहे परंतु इंटरनेट नाही व सर्व्हर अडचणीमुळे धान्य वाटप करता येत नाही. तेव्हा ऑफ लाईन पद्धत ही शासनात व प्रशासनास अगदी योग्य आहे. महागाईच्या निर्देशांकानुसार प्रती क्विंटल ३०० रुपये कमिशन देण्यांत यावे. एकाच अंगठ्यामध्ये सर्व योजनेचा लाभ देने आवश्यक आहे. परंतु तसे न होता अभेक वेळा वेगळा अंगठा ध्यावा लागत असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत उभे रहावे लागते. व वितरणामध्ये अडथळे निर्माण होत आहे. केवायसी साठी आम्ही शासनास मदत करीत आहोत. केवायसीचे प्रती व्यक्ती ५० रुपये स्वस्त धान्य दुकानदारास मिळावे. धान्य वाटपाची आफलाईन पध्दत कायमस्वरूपी सुरू ठेवावी.