मुंबई । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून दोन टप्प्यातील मतदार पार पडले. तरी राज्यातील महायुतीमधील काही जागांवरील तिढा कायम होता. यात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून कल्याण आणि ठाण्यातील जागेवर उमेदवार जाहीर केले नव्हते. अशातच आता आज महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटातून कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.
ठाण्यातून एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार नरेश म्हके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कल्याणमधून विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेच्या अधिकृत कार्यालयातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागांवर भाजपाकडूनही दावा करण्यात येत होता. आता ठाणे आणि कल्याण या दोन्ही क्षेत्रात भाजपाची ताकद सुद्धा वाढली आहे. त्यामुळे या दोन्ही जागा भाजपाला मिळतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज होता. पण ही शक्यता फोल ठरली आहे. महायुतीमध्ये ठाणे आणि कल्याण या दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाने आपल्याकडेच ठेवण्यात यश मिळवलं आहे.