औरंगाबाद : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीष उच्चशिक्षित गर्भवती विवाहितेने आत्महत्या केल्याची घडली आहे. वर्षा दीपक नागलोत (वय ३० वर्ष, रा. प्लॉट नं ७८-७८, गजानन कॉलनी, कन्या शाळेच्या बाजूला, गारखेडा परीसर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रानुसार, शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शिकत असताना २०१२ मध्ये वर्षा यांची नातेवाईक असलेल्या दीपक नागलोत यांच्याशी ओळख झाली. त्यातून प्रेम जुळल्यावर त्यांनी प्रेमविवाह केला. दीपक खाजगी कंत्राटदार आहेत. या दाम्पत्याला ८ वर्षांचा मुलगा दुसरीत शिकत आहे. तर वर्षा सात महिन्यांच्या गरोदर होत्या.
इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलि कम्युनिकेशनमध्ये एमई करून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा शुक्रवारी एमआयटी महाविद्यालयातून ड्युटीवरून परतल्या. त्यानंतर बेडरूमध्ये पंख्याला ओढणीच्या सह्याने गळफास घेतल्याचे सायंकाळी ६.२० वाजता समोर आले.
पती दीपकसह सासरकडील मंडळींनी त्यांना घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. दरम्यान, सासरच्या जाचाला कंटाळून वर्षाने आत्महत्या केल्याचा आरोप मयत वर्षा यांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाची नोंद पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संदीप काळे करत आहेत.