सामान्यांना दिलासा; RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतधोरण समितीची मंगळवारपासून बैठक सुरू झाली होती. या बैठकीत ईएमआय तेवढाच राहिल का त्यामध्ये कोणते बदल होतील याकडे सर्वांचं लक्ष लागू होतं. दरम्यान, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणतेही बदल न केल्याची माहिती दिली. त्यामुळे वाढत्या महागाईत सामान्यांना तुर्तास दिलासा मिळणार आहे.

रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षी मे महिन्यापासून व्याजदरात वाढ करण्यास सुरूवात केली होती. परंतु फेब्रुवारीपासून रेपो दर ६.५ टक्क्यांवर स्थिर आहे. यानंतर एप्रिल आणि जून महिन्यात झालेल्या बैठकीत बेंचमार्क दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नव्हते. दरम्यान, आर्थिक वर्ष २०२४ जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आलाय. तर आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी वाढीचा अंदाज ६.६ टक्के वर्तवण्यात आलाय.

“भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. याशिवाय महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. कंपन्यांची बॅलन्स शीटदेखील अतिशय मजबूत आहे,” अशी माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. भारत योग्य मार्गावर पुढे जात आहे आणि येत्या काळात जगाचे ग्रोथ इंजिन बनेल असंही त्यांनी नमूद केलं.