सामान्य श्रेणीतील लोकांना भेट! कमी पैशात होणार शताब्दी-वंदे भारत पेक्षा चांगला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसीय अयोध्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्येहून देशातील सुपरफास्ट प्रवाशी रेल्वेंना आज हिरवा झेंडा दाखवला. यात अमृत भारत एक्सप्रेस ही नवी रेल्वे आहे. सामान्य लोकांना गरज लक्षात घेता ही रेल्वे सुरु करण्यात आलीय. या नॉन -एसी ट्रेनला सेकंड क्लास आणि अराखीव तसेच स्लीपर कोच देण्यात आले आहेत.

अमृत भारत एक्सप्रेस ही स्लीपर ट्रेन शताब्दी, वंदे भारत आणि राजधानीशी स्पर्धा करणार आहे. याला सर्वसामान्यांची शाही ट्रेन म्हटले जात आहे. याचा अर्थ सामान्य माणसाला प्रीमियम आणि लक्झरी गाड्यांसारख्या सुविधांचा आनंद घेता येईल, तोही कमी पैशात.

अमृत भारत रेल्वेत सुंदर आणि आकर्षक डिझाइनचे सीट्स आणि वस्तू ठेवण्यासाठी कपाटं, मोबाइल चार्जिंग पॉइंट देण्यात आलेत. एलईडी लाइट,सीसीटीव्ही,सार्वजनिक सूचना प्रणाली सारख्या सुविधा देण्यात आल्यात. या प्रकारात पाण्याच्या बाटल्या टांगण्यासाठी स्टँड बसवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या बाटल्या सीटखाली पडून राहणार नाहीत. प्रवाशांना पाण्याची बाटली लटकवता येईल, जेणेकरून ती सीटखाली किंवा इकडे-तिकडे राहू नये.

या ट्रेनच्या दोन्ही बाजुला ६००० एचपी P5 लोकोमोटिवसह ही रेल्वे प्रतितास १३० किमीच्या गतीने धावेल.सध्या अमृत भारत च्या दोन रेल्वे गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. एक दिल्लीहून दरभंगामार्गे अयोध्येला जाईल.तर दुसरी मालवा टाउन आणि बंगळुरू दरम्यान धावणार आहे.

सर्वसाधारण वर्गात शौचालयाच्या बाहेर वॉश बेसिन लावण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना शौचालयात न जाता बाहेरून हात धुता येणार आहेत. पायाने दाब दिल्यास त्यात बसवलेला नळ चालेल. तुम्हाला टॅपला स्पर्श करण्याची गरज नाही. या श्रेणीतील स्वच्छतागृहांमध्ये बायो व्हॅक्यूमचा वापर केला जाईल. आतापर्यंत वंदे भारत व्यतिरिक्त शताब्दी आणि राजधानीमध्ये अशी शौचालये उपलब्ध होती. हे आता सर्वसाधारण श्रेणीत असेल. सुरक्षेच्या दृष्टीने या श्रेणीत कॅमेरे बसविण्यात आले असून, कोणताही अनुचित प्रकार घडल्यास गुन्हेगारांना ओळखता येईल.