सार्वे गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना, शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने चढवला हल्ला!

पाचोरा : शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वे बुद्रुक येथे २९ रोजी पहाटे  ८ ते ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडीस आला. सुजित डिगंबर पाटील (२७) असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही हिंस्र प्राण्याचे पाऊल खुणा आढळून आलेल्या नसून त्याच्या उपस्थितीची कोणतेही चिन्ह आढळून आले नाही.  दरम्यान, घटनेचा पंचनामा केला असून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे वनविभागाचे आर. एफ. ओ ए.एस. मुलाणी यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील सार्वे बुद्रुक येथील सुजित डिगंबर पाटील हा २९ रोजी पहाटे ८.३० वाजता गावाजवळील मक्याच्या शेतात शौचालयास गेला होता. दरम्यान सुजित याचे आई वडील सुजितच्या आजोबांची हतनूर तालुका कन्नड येथे दशक्रिया विधीसाठी गेले होते. ते रात्री परत आल्यानंतर सुजित हा घरी आढळून न आल्याने तो इतकावेळ कुठे गेला याची चौकशी सुरू झाली. सुजितचा मोबाइल सोबत असलेल्या रिंग वाजत होती. मात्र मोबाईल कुठे वाजतो हे कळत नव्हते? घरच्या मंडळींनी थेट नगरदेवळा दुरक्षेत्र गाठुन पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान पोलिस पथक सार्वे गावाच्या आजूबाजूला शोध घेत असताना गावाजवळील मक्याच्या शेतात सुजितचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ मोबाईल वाजला व शौचालयाचे भांडे ही काही अंतरावर आढळून आले. सुजीतच्या गळ्यावर, मानेवर व हातावर हिंस्त्र प्राण्याने लचके तोडल्याचा मोठमोठ्या जखमा आढळून आल्या. रात्री १०:३० वाजेच्या सुमारास नगर देवळा पोलिसांनी सुजितचे शव ताब्यात घेऊन पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे हलविण्यात आले. ३० रोजी  सकाळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन  केले व शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत सुजित यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.  सुजित हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता, त्याने मराठी, इंग्रजी टायपिंग, स्टेनो असे विविध कोर्स पूर्ण केले होते. तो पदवीधर असल्याने व ४० टक्के अपंग असल्याने नोकरीसाठी प्रयत्न करीत होता. सुजित याचे पच्छात आई, वडील व एक बहीण असा परिवार असून  सुजित हा अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
नगर देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद-या घटनेबाबत नगर देवळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विनोद पाटील करीत आहे.
वन विभागाने केला पंचनामा
वनविभागाचे आर. एफ. ओ. ए. एस. मुलाणी, वनपाल ए. बी. देवरे, वनरक्षक वाय. एच. साळुंखे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृत देहाची पाहणी करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र घटनास्थळी बिबट्याचे पाऊल खुणा त्यांना आढळून आलेल्या नसून त्याच्या उपस्थितीची कोणतेही चिन्ह आढळून आले नाही.