लखनौ : उत्तर प्रदेशात गेल्या ४ दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, उपचारासाठी येणार्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली होती. या घटनेमुळे यूपीत एकच खळबळ उडाली असून लोकांनी रुग्णालयासमोर रांगा लावल्या आहेत. वाढत्या उष्णतेमुळे यूपीत मृत्यूचे तांडव सुरु झाल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेशातील बलियामध्ये उष्णतेने कहर सुरूच आहे. येथे उष्णतेच्या लाटेने गेल्या चार दिवसांत ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. लखनौचे आरोग्य संचालक डॉ. एके. सिंह यांनी वाढत्या उष्णतेमुळे रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या संख्येवर सांगितले की, उपचारासाठी येणार्या बहुतेक रुग्णांनी प्रथम छातीत दुखणे, श्वासोच्छवासाचा त्रास आणि नंतर ताप आल्याची तक्रार केली.
आम्ही यूरीन टेस्ट, ब्लड टेस्ट आणि अन्य टेस्ट घेत आहोत. बाकीचे रुग्ण घाबरून रुग्णालयात पोहोचले. इतर दाखल झालेल्या रुग्णांमध्ये अशा लोकांचाही समावेश होतो ज्यांना आधीच आजार झाला होता. आम्ही नमुने घेत आहोत, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दुसरीकडे लखनऊहून आरोग्य विभागाचे एक पथकही रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी बलिया येथे पोहोचले आहे. मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांपैकी बहुतेक बांसडीह आणि गडवार भागातील आहेत. अशा स्थितीत चौकशी समितीने या भागातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.
सीएमओ जयंत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा रुग्णालयाच्या नोंदीनुसार, ५४ मृत्यूंपैकी ४०% रुग्णांना ताप होता, तर ६०% रुग्णांना इतर आजारांनी ग्रासले होते. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, सीएमएस एसके यादव म्हणाले की, दररोज सुमारे १२५ ते १३५ रुग्ण दाखल होत आहेत.