Politics Maharashtra : शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला संपूर्णं महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, साहेबच अध्यक्ष म्हणून हवे, असे म्हणत एका वृद्धाने चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह करत पवार यांना साकडे घातल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
लोहारा तालुक्यातील आरणी येथील बळवंत थिटे यांनी चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह करत पवार यांना साकडे घातले आहे. बळवंत थिटे हे सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी असून आता शेती करीत आहेत. दरम्यान, आज गुरुवारी दुपारी बारा वाजता त्यांनी आपल्या शेतातील चिंचेच्या झाडावर चढून पवारांसाठी सत्याग्रह सुरू केले आहे.
ग्रामस्थांनी बळवंत थिटे यांना झाडावरून खाली उतरण्याची विनवणी केली. परंतु ते आपल्या भूमिकेवर ठाम राहात सत्याग्रह सुरूच ठेवला आहे. शरद पवार यांनी इतरांना विश्वासात न घेता तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली आहे. ही बाब आमच्यासारख्या समर्थकांना वेदनादायी आहे.
त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी, यासाठी झाडावर बसून सत्याग्रह करीत आहे. उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या राष्ट्रवादी काँगेसच्या बैठकीत कोणता निर्णय होतोय ते पाहून झाडावरुन खाली उतरण्याचा निर्णय घेणार असल्याचं बळवंत थिटे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान, शरद पवारांनी आंदोलन कर्त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी तुमच्या भावनांचा आदर करून येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.