सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी प्रतिक्रिया देणे टाळले आहे. त्यामुळे आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “शरद पवारच म्हणाले की, कुठे तक्रार असेल तर चौकशी करा, आता आश्चर्य आहे की, आजोबा एक सांगतात आणि नातू तक्रार करतो. ही काय नवीन पद्धत विकसित केली आहे?,” असे ते म्हणाले.
“आजोबांनी सांगितलं की, जिथे जिथे तक्रारी आहे तिथे चौकशी झाली पाहिजे. आता चौकशी केली की तुम्ही म्हणायचं हे राजकीय आहे. कधीतरी एक भुमिका घ्या ना. अशा संधीसाधू, दुटप्पी भूमिकेतूनच राजकारण संपवण्याचं, सडवण्याचं आणि सामान्य माणसाच्या मनातून उतरवण्याचं काम सुरु आहे. का अशी दुटप्पी भूमिका घेताय?” असा सवाल मुनगंटीवार यांनी केला आहे.
तसेच शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनीसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “शरद पवारांना माहित आहे या कारवाईमध्ये काय घडलं आहे. म्हणून पुढचे होणारे परिणाम हे कदाचित त्यांना माहिती असावे. म्हणून त्यांनी यावर बोलणं टाळलं आहे,” असे संजय शिरसाट म्हणाले आहेत.