पुणे : अजित पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात ’मला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करा’, अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मला संघटनेतील कोणतंही पद द्या, मी त्या पदाला न्याय देईन, असे अजित पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, अजितदादांची इच्छा पूर्ण व्हावी, हीच माझीही इच्छा आहे.
मला मनापासून आनंद हे की, दादालाही संघटनेत काम करायची इच्छा आहे. यामुळे कार्यकर्ता केडरमधे उत्साह संचारला आहे. दादांना प्रदेशाध्यक्षपद द्यायचं की नाही हा संघटनात्मक पातळीवरचा निर्णय आहे. माझ्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत, हेच बहीण म्हणून मला वाटते, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
अजित पवार म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार तीन वर्षांनी नवा प्रदेशाध्यक्ष निवडणे अपेक्षित आहे. मात्र, जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्षपदी येऊन ५ वर्ष १ महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांचा डोळा जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदावर आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.
याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, अजित पवारांसारखा सक्षम नेता जेव्हा ही भूमिका मांडतो तेव्हा असं दिसतं की, संघटनेतील कामासाठी त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली असावी. तसं असेल तर सर्व कार्यकर्त्यांना आनंदच आहे. मी अजित पवारांच्या मागेच बसलो होतो. त्यांना असं म्हणायचं असेल की, ही जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे. त्यामुळे कृपया काही वेगळे अर्थ लावू नका, असे अमोल कोल्हे यांनी सांगितले.