सोलापूर : रामध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांसह त्यांच्या गटातील सर्व नेत्यांना इशारा दिला आहे. वयाने मोठे आहात म्हणून तुमचा मान सन्मान ठेवतेय, गुण्या गोविंदाने राहा. शरद पवारांवर टीका करू नये. ज्यादिवशी पवारांवर टीका कराल, एकदा, दोनदा, तीनदा ऐकून घेईन पण चौथ्यांदा करारा जबाब मिळेल ज्यानं तुम्हाला मतदारसंघात फिरणे मुश्किल होईल अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी पहिल्यांदाच अजित पवारांसह सर्व नेत्यांना इशारा दिला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. अदृश्य शक्तींनी ४ मराठी माणसांवर अन्याय केला, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी. या चौघांवर अन्याय केला, नितीन गडकरींचे अधिकार कमी केले, देवेंद्र फडणवीस दहापैकी दहा होते त्यांना अडीचवर आणले. शरद पवारांना हुकुमशाह म्हणाले, पक्ष, चिन्ह काढून घेतले. तुम्ही कितीही म्हटला तरी काश्मीर ते कन्याकुमारी कुणालाही विचारा, NCP कुणाची तर ती शरद पवारांची पार्टी आहे असंही सुप्रिया सुळेंनी ठणकावले.
दरम्यान, पक्ष आम्हाला मिळणार हे सांगितले जाते, याचा अर्थ त्या अदृश्य शक्तीने तुला पक्ष मिळणार आहे हे सांगितले आहे. बायकांच्या नादी लागू नका, तो शरद पवार…असं बोलतात, आज वकिली कर, आज ना उद्या तुझा नाही करेक्ट कार्यक्रम केला तर शरद पवारांची पोरगी सांगणार नाही. शरद पवार स्वत: निवडणूक आयोगाच्या सुनावणीला हजर राहिले. निवडणूक आयोगाची पहिली नोटीस तिकडून आली, आपण पाठवली नाही.
८३ वर्षाचा माणूस दिल्लीला जाऊन स्वत: बाळाला ज्याला जन्म दिलाय त्या पक्षासाठी निवडणूक आयोगासमोर जाऊन बसले, ज्याला पक्ष हवा होता ते होते का? कोणी आलं नव्हते. वकील आला होता, त्या वकिलाचा करेक्ट कार्यक्रम करणार आहे. माझा स्वभाव असा नव्हता, मागितले असते तर माझ्या भावाला सर्व दिले असते. दिलदार आहे मी, शून्यातून माझे विश्व उभे केले असते असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.