मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. शरद पवार निवृत्तीच्या घोषणेवर ठाम असल्याने पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण अशी चर्चा सर्वत्र आहे. त्यात प्रामुख्याने सुप्रिया सुळे यांचे नाव आघाडीवर आहे. पक्षातील नेत्यांच्या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याशिवाय अजित पवार यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते.
सुप्रिया सुळे अनेक वर्षापासून दिल्लीत सक्रीय आहेत. वेगवेगळ्या प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध आहेत. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाने पक्षाला चांगला फायदा होऊ शकतो. यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड होऊ शकते. दुसरीकडे अजित पवार हे केंद्रात नेतृत्व करण्यास इच्छुक नाहीत. राज्याच्या राजकारणात अजित पवारांना रस आहे. त्यात राज्यातील राजकारणात अजित पवारांचे वर्चस्व आहे. अजित पवार यांचा आमदारांवर प्रभाव आहे. त्यामुळे अजित पवार हे राज्याच्या राजकारणात सक्रीय राहणार तर सुप्रिया सुळे केंद्रात पक्षाचे नेतृत्व करतील असं सांगितले जात आहे.