सुवर्ण संधी; म्हाडाच्या ११ हजार घरांच्या किमती कमी होणार; वाचा सविस्तर

मुंबई : मध्यंतरी म्हाडातर्फे मोठी लॉटरी काढण्यात आली होती. मात्र घरांच्या किंमती जास्त असल्याचे कारण पुढे करत अनेकांनी त्यासाठी अर्जच केले नाही. परिणामी म्हाडाच्या लॉटरीला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. लॉटरी नंतर अनेक घर पडून आहेत. यामुळे पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय म्हाडातर्फे घेण्यात आला आहे. याबद्दल गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

अनेक दिवस म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्या किंमती कमी होणार आहेत. यावेळी विक्री सरसकट नाहीतर म्हाडा लॉटरीतील पडून असलेल्या घरांच्याच किमती कमी होणार असल्याचे अतुल सावे यांनी स्पष्ट केले आहे. म्हाडाच्या जवळपास ११ हजार घरांच्या किंमती कमी होणार आहेत. संबंधित घरांचे वीज बिल, पाणी पट्टी भरावी लागत असल्याने म्हाडाच्यावतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे अतुल सावे यांनी सांगितले आहे.

संबंधित घरांचे वीज बिल, पाणी पट्टी यामध्ये म्हाडाचा बराच पैसा खर्च होतो. अशा जवळपास ११ हजार घरांची कमी किमती करुन पुन्हा विक्री करण्यात येणार असून नुकसान टाळत महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे अतुल सावे म्हणाले. आता किंमती कमी केल्यानंतर म्हाडाच्या घरांना कसा प्रतिसाद मिळतो? हे महत्वाचे ठरेल.

दरम्यान, पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील सदनिकांची सोडत पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत सुमारे ५ हजार ८६३ सदनिकांची सोडत शुक्रवारी (दि. २४) होणारी होती. ही सोडत प्रशासकीय कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली असून, लवकरच अर्जदारांना त्याबाबत कळविण्यात येईल, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.

या सोडतीत पुणे जिल्ह्यातील ५ हजार ४२५, सोलापूरमधील ६९, सांगलीतील ३२ व कोल्हापूर जिल्ह्यातील ३३७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत, तसेच म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ४०३ सदनिका, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत ४३१ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत २५८४ सदनिका व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत २४४५ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत, असे ‘म्हाडा’ने कळविले आहे.