मुंबई : या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याचे दिसून आले. यामुळे सोन्याचा दर सात महिन्याच्या नीच्चांकीवर आला आहे. चांदीचा दरही ६८ हजाराच्या घरात आला आहे. पितृपक्षात मौल्यवान धातुंच्या मागणीत घट होणे हे दर कमी होण्यामागील कारण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र दिवाळीपर्यंत दोन्ही धातूंच्या किमतीत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण व्यवहारात चांदीच्या दरात 1500 रुपयांहून अधिक घसरण झाली आहे. त्याचबरोबर सोनेही सुमारे ७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 56898 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर बंद झाला. त्याच वेळी, गेल्या आठवड्यात सोने 57600 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर बंद झाले होते, त्यामुळे एका आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 702 रुपयांची घसरण दिसून आली आहे.
याशिवाय चांदीच्या किमतींबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात चांदीचा भाव 68290 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे. तर गेल्या आठवड्यात चांदी 69857 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. त्यानुसार चांदीच्या दरात किलोमागे 1576 रुपयांची घसरण झाली आहे.