जळगाव । सध्या सोन्यासह चांदीचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ऐन लग्नसराईच्या काळात सोने आणि चांदीच्या वाढलेल्या किमतींनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. नवीन वर्षात सोने चांदीचे दर कुठवर जाणार याकडे खरेदीदारांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, जळगावच्या सुवर्णनगरीत या आठवड्यात सोन्याच्या दरात ९५० रुपयाची वाढ दिसून आली आहे.
यामुळे जळगावात सोन्याच्या दराने ६३ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. नोव्हेंबर महिन्यात ६२ हजारांच्या घरात असलेल्या सोन्याचे दर महिन्याच्या पहिल्या तारखेला ९०० रुपयांनी वाढून ६५ हजार ९६ रुपये प्रति तोळा झाले होते. ४ डिसेंबर रोजी ते ६६,२२९ रुपयांवर पोहोचले होते.
दुसऱ्याच दिवशी १३०० रुपयांची घसरण होऊन दर ६४,८९० रुपये झाले होते. ही घसरण चालूच राहत गत पंधरवड्यात दर ६२ हजारांवर होते. त्यात २३ डिसेंबरला पुन्हा ३५० रुपयांची वाढ होऊन तीन टक्के जीएसटीसह दर ६५, २५० रुपये झाले. तर विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ६३,३५० रुपये इतका आहे.
चांदीचा दर :
चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या आठवड्यात चांदी ३५०० रुपयांनी महागली होती. तर या आठवड्यात चांदीच्या किंमतीत २३०० रुपयांची भर पडली. दोन आठवड्यात एकूण ५८०० रुपयांनी भाव वाढला. सध्या एक किलो चांदीचा भाव विनाजीएसटी ७५००० रुपये आहे.
दरम्यान, सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणावर बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठा यावर अवलंबून असते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. सोन्याचा पुरवठा वाढला तर किंमत कमी होईल. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोन्याकडे पाहतील. त्यामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होईल.