सोन्याच्या कितमीने फोडला ग्राहकांना घाम ; जळगावात 48 तासात 2000 रुपयांची वाढ

जळगाव | सोन्याच्या कितमीने सध्या ग्राहकांना चांगलाच घाम फोडला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याने वर्षभरातील नवीन उच्चांक गाठला. गेल्या दोन दिवसात भाव गगनाला भिडले. दोन हजारांची रेकॉर्डब्रेक चढाई सोन्याने केली आहे. यामुळे विनाजीएसटी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव 64 हजार रुपयाच्यावर पोहोचला आहे. तर जीएसटीसह सोने प्रतितोळा 66 हजार रुपयांच्या घरात पोहचले आहे.

दरवाढीमागील कारण काय?
अमेरिकेतील फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदरांनी आपली गुंतवणूक ही सोन्यात करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे.

जळगावातील आजचा भाव :
गेल्या 48 तासात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची वाढ झाली आहे. आज, 7 मार्च रोजी सुवर्णनगरीत सोन्याचा विनाजीएसटी 64,500 रुपये असा भाव आहे. जीएसटीसह सोन्याचे दाम 66 हजार रुपयांच्या घरात पोहचतात. जळगावात चांदीच्या भावात 700 रुपयांची घसरन होऊन ती 72 हजार 800 रुपये प्रति किलो वर आली.

दरम्यान, सोन्याच्या या वाढत्या दरामुळं ग्राहकांचा फारसा प्रतिसाद सोने खरेदीसाठी नसल्याचे पाहायला मिळत आहे. घरात लग्नकार्य असल्यानं सोने खरेदी करणे गरजेचे असल्यानं काहीजण वाढत्या जरातही खरेदी करत आहेत. अचानक सोन्याच्या वाढत्या दरामुळं बजेट बिघडल्याची माहिती अनेक ग्राहकांनी दिली आहे. सोने खरेदीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत असल्यानं ग्राहकांनी खंत व्यक्त केली आहे.