जळगाव : उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील सुमारे सोळाशे ‘युवा’ विविध भारतीय कलेच्या अविष्काराच्या रंगांची उधळण रविवार, 8 ऑक्टोबरपासून कान्ह नगरीत (मू.जे. महाविद्यालय) करणार आहेत. याची झलक आज 7 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता निघणाऱ्या पथसंचलनातून जळगावकरांना अनुभवयास मिळणार असल्याची माहिती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, मू.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य संजय भारंबे यांनी आज महाविद्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवारंग 2023 महोत्सवाचे खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात 8 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
परिसराला दिले कान्ह कलानगरी नाव
या महोत्सवात सलग पाच दिवस विविध भारतीय कलांचे सादरीकरण होणार असल्याने मु.जे. महाविद्यालय परिसराला कान्ह कलानगरी हे नाव देण्यात आले आहे.
लोगोचे अनावरण
यावेळी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.जयेंद्र लेकुरवाले, प्राचार्य संजय भारंबे (मूळजी जेठा महाविद्यालय), व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. पवित्रा पाटील, शशिकांत वडोदकर (सांस्कृतिक समन्वयक), युवारंग समन्वयक डॉ.जुगलकिशोर दुबे, सहसमन्वयक डॉ.मनोज महाजन यांच्या हस्ते ‘युवारंग’च्या “कान्ह कलानगरी” लोगोचे विमोचन यावेळी करण्यात आले.
सोळाशे युवा कलाकारांचा सहभाग : उद्या पथसंचलन
जळगाव, धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यातील 111 महाविद्यालयातील सुमारे 1600 युवा कलाकारांनी सहभाग घेतला आहे. पहिल्या दिवशी शनिवार, 7 रोजी दुपारी 4 वाजता मु.जे. महाविद्यालयातून सांस्कृतिक पथसंचलनास प्रारंभ होईल. या पथंचलनात विद्यार्थी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध विषयांनुसार पेहराव करून पथसंचलनात सहभागी होणार आहेत.
रविवारी उद्धघाटन सोहळा
रविवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता उद्घाटन सोहळा होईल. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे आदी मान्यवर उपस्थिती राहतील.
पाच रंगमंच : खान्देशातील पाच कलावंत
पाच दिवस चालणाऱ्या युवारंग युवक महोत्सवात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत. त्यांना खान्देशातील पाच दिग्जज कलावंतांची नावे देण्यात आली आहेत. यात कवयित्री बहिणाबाई चौधरी रंगमंच क्रमांक-1 (एकलव्य क्रीडांगण) मुख्य रंगमंच, पद्मश्री ना.धो. महानोर रंगमंच क्रमांक-2 (ओल्ड कॉन्फरन्स हॉल), पूज्य साने गुरुजी रंगमंच क्रमांक -3 (हॉल क्रमांक 29 मुख्य इमारत, पहिला मजला),भारतरत्न लता मंगेशकर रंगमंच क्रमांक-4 (ग्रंथालय जवळील वाचनालय), कलामहर्षी केकी मूस रंगमंच क्रमांक-5 (ह्युमॅनिटीज बिल्डिंग)
या भारतीय कलांचे होणार सादरीकरण
या युवारंग युवक महोत्सवात संगीत- भारतीय शास्त्रीय गायन ,भारतीय शास्त्रीय वाद्य,संगीत -नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत,भारतीय समूह गाण, भारतीय लोकसंगीत,वाद्य-पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य, संगीत पाश्चिमात्य समूह गान, नृत्य- भारतीय शास्त्रीय नृत्य,भारतीय लोक समूह नृत्य.
असे आहेत वाङ्मयीन कला प्रकार
वाङ्मयीन कला प्रकारात वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा रंगमंच या कला प्रकारात नक्कल, मुकाभिनय, प्रहसन आणि ललित कला प्रकारात स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग ,माती कला ,व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्र ,इन्स्टॉलेशन, मेहंदी या विषयांवर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत.
विद्यापीठ कार्यक्ष्ोत्राबाहेरील परिक्ष्ाक
स्पर्धेचा निकाल पारदर्शी लागावा यासाठी यावर्षी विद्यापीठ कार्यक्ष्ोत्राबाहेरील परिक्ष्ाकांची नियुक्ती विद्यापीठाने केली आहे.
अशी आहे विद्यार्थ्याची निवास व्यवस्था
विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था स्वामी विवेकानंद भवनात 600 विद्यार्थ्यांची तर 775 विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था मुलींच्या वसतिगृहात केली आहे.
चार महोत्सवांचे आयोजन
विद्यापीठातर्फे दरवर्षी केवळ युवारंग महोत्सवाचेच आयोजन केले जात होते. मात्र या वर्षापासून युवा महोत्सवासह खान्देश लोककला महोत्सव, विद्यार्थी साहित्य संमेलन, दिव्यांग महोत्सव असे तीन महोत्सव घेण्यात येणार असल्याचे प्रा. लेकुरवाळे यांनी सांगितले.लोककला महोत्सव धुळ्याच्या विद्यावर्धीनी महाविद्यालयात, साहित्य संमेलन अमळनेरला तर दिव्यांग महोत्सव यावलच्या भालोद महाविद्यालयात होणार आहे.
सुरभी हांडेच्या हस्ते पारितोषीक वितरण
कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण 11 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे प्र -कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, असतील. तर पारितोषिक वितरण खान्देशाची सुप्रसिद्ध सिने कलाकार, जय मल्हार फेम सुरभी हांडे यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले (सहसचिव केसीई सोसायटी) ज्ञानदेव पाटील (खजिनदार, केसीई सोसायटी), कार्याध्यक्ष राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), भालचंद्र पाटील (सदस्य केसीई सोसायटी)उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.जयेंद्र लेकुरवाले, डॉ.पवित्रा पाटील, प्राचार्य संजय भारंबे, शशिकांत वडोदकर, युवारंग समन्वयक डॉ.जुगलकिशोर दुबे, सहसमन्वयक डॉ.मनोज महाजन, जनसंपर्क अधिकारी संदीप केदार उपस्थित होते.