सोशल मिडीयावर आमदार चंद्रकांत पाटील यांची बदनामी : विनोद पाडरांविरोधात गुन्हा

बोदवड : आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बदनामीकारक पोस्ट टाकल्याप्रकरणी अमोल व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून विनोद नामदेव पाडर (शारदा कॉलनी, बोदवड) यांच्याविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सुरूवातीला कलम 500 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला मात्र दिलेल्या तक्रारीतील मजकुरानुसार गुन्हा दाखल न झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडत जोरदार घोषणाबाजी केल्याने वातावरण तप्त झाले होते. बोदवड निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी आंदोलकांशी चर्चा करत लेखी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

तेढ निर्माण करणार्‍या नेहमीच पोस्ट
अमोल व्यवहारे यांच्या तक्रारीनुसार, विनोद पाडर हे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नेहमीच पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजातील दोन गटात तेढ निर्माण होउन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विनोद पाडर यांच्या गैर कृत्यामुळे शिवसेना पक्षाची व मराठा समाजाची बदनामी होत असून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकण्यास बाधा व्हावी या उद्देशाने फेसबुक पेजवर ते पोस्ट टाकत असल्याने शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते दुखावले गेले आहेत. विनोद पाडर यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम (153 व 153 अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.