तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून अशातच केरळ मधून एका भीषण अपघाताची बातमी समोर येतेय. केरळच्या कासारगोड जिल्ह्यात स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या धडकेत चार महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शाळकरी मुलांना घरी सोडल्यानंतर परतणाऱ्या एका वेगवान बसने ऑटोला धडक दिली.
सूत्रानुसार, प्राथमिक तपासानुसार बस चुकीच्या दिशेने वेगात जात होती. त्यामुळे हा अपघात झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. बस शाळकरी मुलांना त्यांच्या घरी सोडल्यानंतर परतत होती. त्यामुळे बसमध्ये मुलं नव्हती. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ऑटोचालकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
या भीषण अपघातात स्कूल बस आणि ऑटोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बस चालकाला पोलिसांनी अटक केली असून लवकरच याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात येईल. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली नाही. मृत चारही महिला एकाच कुटुंबातील आहे.