नंदुरबार : स्वच्छता आणि आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवावी, यासाठीच या पंधरवड्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. स्वच्छता ही मोहीम केवळ उपक्रमापुरती मर्यादित न राहता ती लोक चळवळ व्हावी. यासाठी सर्वांनी या लोकचळवळीत सहभागी होऊन आपल गाव व परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत यांनी केले.
देशात दि. १५ सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे . या अनुषंगाने केंद्र शासनाच्या सूचनानुसार दि. १ ऑक्टोबर रोजी ‘एक तारीख एक तास महाश्रमदान ‘ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कोळदा ता.जि.नंदुरबार येथे महाश्रमदानाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ .सुप्रिया गावित यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करित असताना त्या बोलत होत्या.
डॉ. गावित पुढे म्हणाल्या की, दैनंदिन जीवनात स्वच्छतेची सवय अंगीकारल्याने परिसरातील वातावरण प्रसन्न राहून काम करण्यास प्रोत्साहन मिळते. तसेच गाव व परिसर स्वच्छ ठेवल्याने गाव रोगराई पासून मुक्त होते. आज जिल्हाभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत एकाच दिवशी जिल्हा परिषदेच्या वतीने 867 ठिकाणी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रामपंचायतीतील शाळा , अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, या ठिकाणी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. स्वच्छता मोहीम ही केवळ प्रसिद्धीसाठी उपक्रम न होता ती सवय व्हावी व यासाठी सर्वांनी दैनंदिन जीवनात स्वच्छतेचा अंगीकार करावा असे आवाहनही त्यांनी केले.
यानंतर अध्यक्षा डॉ. गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देऊन ग्रामपंचायत व परिसरात स्वतः श्रमदान करून परिसर स्वच्छता केली. यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी वळवी , उपसरपंच आनंद गावित, पंचायत समिती सदस्य कालसिंग वळवी, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, शासकीय कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.