मुंबई : महाराष्ट्रात सध्या छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक की धर्मवीर हा वाद सुरू आहे. याच विषयावर छत्रपती शाहू महाराज यांनी आपली भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवराय किंवा छत्रपती संभाजीराजेंबाबत बोलताना प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे असं शाहू महाराजांनी म्हटलं आहे.
महापुरुषांबाबत कुठलेही वाद निर्माण होता कामा नयेत. महापुरूषांविषयी बोलत असताना प्रत्येकाने काळजीपूर्वकच बोललं पाहिजे. छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी बोलताना प्रत्येकाने काळजी घेतलीच पाहिजे. लोकशाही म्हटल्यावर भिन्न विचार असतात. कुणाच्या दृष्टीकोनातून काही उपाधी दिल्या जातात. त्यातलं आपल्याला योग्य वाटेल तेच आपण घ्यावं इतर गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सामाजिक भान ठेवणं ही प्रत्येकाकडून अपेक्षा आहे. समाज एकसंध कसा राहिल हे आपण पाहिलं पाहिजे असंही छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणू नये अशी भूमिका मांडली होती. यावर चांगलाच वाद झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत असं म्हटलं होतं. मग देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार जे म्हणत आहेत तो एक प्रकारचा द्रोह आहे असंही म्हटलं. तर अजित पवार यांनी यावरही गुन्हे दाखल करा असं ओपन चॅलेंज दिलंय. यामुळे हा वाद चांगलाच पेटलायं. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून दोन नेत्यांमधला कलगीतुराही महाराष्ट्राने पाहिला. आता शाहू महाराज यांनी मात्र महापुरूषांविषयी कुणीही वाद निर्माण करू नये जबाबदारीने वागावं असं म्हटलं आहे.