हतनूरवरील भूकंपमापक यंत्र सहा वर्षानंतरही बंदच

भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळ तालुक्याला संजीवनी ठरणार्‍या महाकाय हतनूर धरणावर नाशिकच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) भूकंपमापक यंत्र (सीजमोमीटर) यंत्र बसवले असलेतरी हे यंत्र गेल्या सहा वर्षानंतरही दुरुस्त झाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भुसावळसह परीसरात शुक्रवारी 3.3 रीस्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले शिवाय भूकंपाचा केंद्रबिंदू भुसावळ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हतनूरवरील बंद पडलेल्या यंत्राचा विषय ऐरणीवर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिकच्या मेरीकडे हे यंत्र दुरुस्तीसाठी पाठवण्यात आले मात्र त्याचे सुटे भाग मिळत नसल्याने त्याची दुरुस्ती अशक्य असल्याचा अभिप्राय पाठवण्यात आला असून नवीन यंत्र खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना भुसावळात आल्यानंतर याबाबत विचारणा केली असता लवकरच याबाबत यंत्राची तजवीज करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

माहितीची मदार केवळ ‘मेरी’वरच
हतनूर धरणावर भूकंप तीव्रता मोजणी (भूकंपालेख) यंत्र असलेतरी सहा वर्षानंतरही या यंत्राची दुरुस्ती झालेली नाही. धरण परीसरात भूकंपाच्या तीव्रतेची नोंद घेणारी कोणतीही पर्यायी यंत्रणा कार्यान्वित नाही शिवाय वाघूर धरणावरही अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आलेली नाही त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. धरण क्षेत्रात पाण्याचा दबाव असल्याने भूकंपाचा धोका वाढतो. 24 तास कार्यरत असलेली ही यंत्रणा आपत्तीच्या कालावधीत कारणांच्या मूळापर्यंत जाण्यासाठी मदतीची ठरते.

नवीन यंत्राचा पर्याय
भुसावळ भेटीवर आलेल्या जिल्हाधिकार्‍यांना हतनूर धरणावरील बंद यंत्राच्या माहितीबाबत अद्ययावत करण्यात आले असता त्यांनी तातडीने त्यासाठी निधीची उपलब्धता करून पर्यायी व्यवस्था लवकरच करण्यात येईल, असे आश्वासन दिले.