पुणे : स्मार्टफोन हरवला किंवा चोरी झाला तर? आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कारण सध्या आपली निम्म्याहून अधिक कामे स्मार्टफोनच्या मदतीनेच होवू लागली आहे. फोन चोरीला गेला की तो परत मिळण्याची शक्यता जवळपास नसतेच, कारण चोर त्यातील सीमकार्ड काढून फेकून देतो व फोनही फॉरमॅट करुन टाकतो. मात्र यापुढे तुमचा स्मार्टफोन हरवला किंवा चोरी झाला तर टेन्शन घेवू नका कारण चोरीचे मोबाईल लवकरात लवकर शोधण्यासाठी केंद्र सरकारने नवीन सिस्टीम तयार केली आहे.
सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) असं या सिस्टीमचं नाव आहे. हरवलेले किंवा चोरी झालेले मोबाईल फोन शोधण्यासाठी केंद्राच्या टेलिमॅटिक्स विभागाने तयार केलेलं हे एक रीजनल पोर्टल आहे. महाराष्ट्रासह दिल्ली आणि कर्नाटकात याची चाचणी घेण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या काळात या सिस्टीमच्या मदतीने तब्बल ७११ मोबाईल शोधले. यानंतर आता १७ मे रोजी ही सिस्टीम देशभरात लाँच करण्यात येईल.
मोबाईल चोरी झाल्यानंतर तो ब्लॉक करण्यासाठी वापरकर्त्याने फोनचा IMEI नंबर टेलिकॉम कंपन्यांना द्यावा. त्यानंतर २४ तासांमध्ये तो फोन ब्लॉक केला जातो. मोबाईल ब्लॉक झाल्यानंतर संपूर्ण देशभरात कुठेच त्याचा वापर करता येत नाही. जर मोबाईल चोरणार्या व्यक्तीने फोनचा IMEI नंबर बदलण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्याबद्दल लगेच सरकारला माहिती मिळेल. मोबाईल मिळाल्यानंतर पुन्हा पोर्टलवर जाऊन तुम्ही तो अनब्लॉक करू शकता.
IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी CEIR वेबसाईटवर जाऊन तुम्हाला एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. यावेळी तुम्हाला त्यातील सिम कार्डचा नंबर, आयएमईआय नंबर, मोबाईलचा ब्रँड, मॉडेल, खरेदीची पावती, मोबाईल कुठून हरवला, पोलीस तक्रारीची प्रत, मोबाईल कुणाच्या नावावर आहे त्या व्यक्तीचे ओळखपत्र अशा गोष्टी भराव्या लागतील. यानंतर येणारा ओटीपी सबमिट करून तुम्ही फॉर्म भरू शकाल.
फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक ‘रिक्वेस्ट आयडी’ मिळेल. याचा वापर करुन तुम्ही तुमच्या रिक्वेस्टचे स्टेटस पाहू शकता. तुमचा मोबाईल मिळाल्यानंतर तो वापरण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला IMEI अनब्लॉक करावा लागेल. यासाठी CEIRच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अनब्लॉक रिक्वेस्ट टाकावी लागेल. त्यासाठीचा फॉर्म भरल्यानंतर काही वेळामध्ये तुमचा आयएमईआय अनब्लॉक होईल.