हवामान खात्याचा चिंता वाढवणारा अंदाज! जळगावला ‘या’ तारखेपर्यंत वादळी पावसाचा अलर्ट

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : राज्यात एकीकडे उन्हाचा चटका बसत असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागाला गारपिटीसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे. यामुळे शेतकरी आणखीच अडचणीत आला आहे. दरम्यान, आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून आधीच जळगावसह राज्यातील विविध भागात गारपीटसह वादळी पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार काल गुरुवारी काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसह वादळी पावसाने तडाखा दिला आहे.जळगावातील काही तालुक्यांमध्ये गारपीट झाली सोबतच वादळी पाउसही झाला. जळगाव जिल्ह्याला आजपासून 30 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आधी झालेल्या अवकाळीने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. यातून शेतकरी सावरत नाही त्यातच अवकाळीचा आणखी तडाखा बसण्याची शक्यता आहे.

 

आज या जिल्ह्यांना अलर्ट जारी

पश्‍चिम विदर्भापासून, मराठवाडा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाची स्थिती कायम असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामान खात्याने पुण्यासह सातारा, सांगली, नाशिक, नगर, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार, चंद्रपूर, वाशीम, लातूर, बुलडाणा, गडचिरोली, धाराशिव, अकोला, वर्धा या १७ जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आज शुक्रवारी (२८ एप्रिल) मराठवाडा, विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, राज्यातील बीड, नांदेड, यवतमाळ, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, अमरावती, भंडारा, गोंदिया. अवकाळी पाऊसासह जोरदार गाटपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.