नवी दिल्ली : भाजपला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ मिळालेला चमकदार विजय हा कार्यकर्त्यामुळेच शक्य झाला आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा व राज्यसभा सदस्यांना संबोधित केले. यावेळी तीन राज्यांमधील भाजपच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
निवडणुकीचे निकाल उत्कृष्ट लागले असून मिझोराममध्येही भाजपची ताकद दुप्पट झाली आहे. तेलंगणात भाजपची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. भाजप केंद्रात मजबूत असली तरी राज्य पातळीवर त्यांची ताकद नाही, अशी पसरविण्यात येणारी अफवा या निकालांनी चुकीची असल्याचे सिद्ध केले आहे. काँग्रेस पक्ष सलग दोनवेळा सत्तेत राहून निवडणुकीस सामोरे जाण्याची संधी काँग्रसला सातवेळा मिळाली आहे. मात्र, त्यांना केवळ एकदाच सलग तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त करता आली आहे. याऊलट भाजप सलग दोनवेळा सरकारमध्ये राहिल्यानंतर 17 वेळा भाजपला निवडणुकीस जाण्याची संधी मिळाली आणि भाजपने 10 वेळा विजय मिळवला. गुजरातसारखे राज्य भाजपने सात वेळा जिंकले आहे आणि मध्यप्रदेशातही सतत जिंकत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भाजप सरकारवर जनतेचा विश्वास असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भाजपचा कारभार, निर्णयक्षमता आणि पारदर्शकता आणि सकारात्मकता जनतेला पसंत आहे. सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी अर्थात अँटी इन्कम्बन्सी भाजपसाठी अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकांमधील विजय हा भाजपच्या सामूहिक ताकदीचा विजय आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता आणि पक्ष उभारणीसाठी आयुष्य वेचणाऱ्यांमुळे हा विजय शक्य झाल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.
‘मोदीजी’ नव्हे केवळ ‘मोदी’
मला ‘मोदीजी’ असे संबोधन करणे थांबवा. कारण, त्यामुळे मला जनतेपासून दूर होत असल्यासारखे वाटते. त्यामुळे मी केवळ ‘मोदी’ असून मला त्याच नावाने संबोधण्यात यावे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.