नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात शनिवारी रात्री मुस्लिम तरुणांनी जबरदस्तीने घुसून चादर चढविण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्र्यंबकेश्वर मंंदिरात जबरदस्तीने प्रवेश करण्याच्या प्रकाराची अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमून चौकशीस सुरुवात झाली आहे. दरम्यान बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिर शुद्धिकरण करून आरती केली.
त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम तरुणांनी शनिवारी रात्री जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला तेथील सुरक्षारक्षकांसह ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. रविवारी पोलिसांनी शांतता समितीच्या बैठकीत दोन्ही गटांची समजूत काढत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुधवारी सकाळी हिंदू महासभा, ब्राह्मण महासंघ, नाशिक पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ यासह वेगवेगळ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरून गुलाब पाणी, गोमुत्राचा वापर करून शुद्धिकरण केले. यावेळी हर हर महादेव असा जयघोष करण्यात आला. मंदिर शुद्धिकरणाच्या पूजेनंतर महाआरती करण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.