नागपूर : हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार नागपुरात मुक्कामी आहे. संत्रानगरीत उद्यापासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होईल. सध्याच्या राज्यातील प्रश्नांना घेऊन हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे.
या अधिवेशनाच्या काळात विविध आंदोलनं होणार आहेत. जवळपास 100 मोर्चे विधिमंडळात धडकणार असल्याची माहिती आहे. यातच्या 45 पेक्षा जास्त मोर्चांना आतापर्यंत परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सभागृहासह सभागृहाच्या बाहेरच्या आंदोलनांनी यंदाचं अधिवेशन गाजणार आहे.
आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, अवकाळी पावसामुळे नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारीवरून सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल, तर सत्ताधारी ‘निकाला’चे आश्वासन देण्याचा प्रयत्न करतील.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात निर्माण झालेल्या सामाजिक स्थितीवर विधिमंडळात चर्चा होणार असून, सरकारकडून तसा प्रस्ताव मांडला जाणार आहे. या प्रस्तावावरील चर्चेत सभागृहात खडाजंगी होण्याचे संकेत आहेत.