राज्यात मराठा आरक्षणासाठी वातावरण तापलेलं आहे. अशास्थितीत उबाठा गटप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह दुपारी १ वाजता डेहराडूनला रवाना झाल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे दिली. दरम्यान भाजपच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस छत्तीसगड दौऱ्यावर असल्याने उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांचे उपोषण सुटेपर्यत थांबता आला नाही का? हीच तुमची मराठा आरक्षणाची काळजी होती का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस सहलीसाठी छत्तीसगडला गेले नव्हते, पक्षाच्या कामासाठी गेले होते, असे म्हणत ठाकरेंना राणेंनी चांगलाच टोला लगावला आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाणार असल्याची माहिती नितेश राणे यांनी दिली होती.नितेश राणे म्हणाले होते की, सुशांत सिंह आणि दिशा सालियान प्रकरणी अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे दसऱ्यानंतर परदेशात पळून जाणार आहेत. आणि आता राणेंनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे कुटुंबीय खासगी विमानाने डेहराडूनला दि. २ नोव्हेंबर रोजी रवाना झाले आहे.