ही गुगली की, ती गुगली?

राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार व त्यांच्या सहकार्यांनी पक्षाचे नुकतेच नियुक्त झालेले कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या सक्रिय पाठिंब्याने महाराष्ट्रात घडवून आणलेल्या महाभूकंपाचे राजकीय परिणाम समोर यायला आणखी काही काळ, कदाचित 2024च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत वाट पाहावी  लागेल पण  लगेचच प्रतिक्रिया द्यायची असेल तर भारतीय राजकारणातील गुगलीपटु श्रीमान शरद पवार  यांची 2019ची गुगली खरी होती की, आजच्या घडामोडीनाही  गुगलीच म्हणायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अजितदादा प्रभृतींच्या शपथविधिनंतर लगेच पुण्याहून मुंबईत येऊन त्यानी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर या घडामोडींचा काहीही परिणाम झाला नसल्याचे चित्र सादर करण्याचा प्रयत्न केला असला तरी ते शरद पवार आहेत, गुगलीपटु आहेत हे लक्षात घेता उद्या त्यांनी या गुगलीचेही श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर ते आश्चर्य ठरणार नाही. पण या घडामोडींचा नेमका अर्थ काढायचा झाल्यास इतक्या लवकर त्याबाबत निश्चित असे काहीही म्हणता येणार नाही.

एक मात्र निश्चित की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात शरद पवारानीच सुरू केलेली देवेंद्र फडणवीस यांच्याविरूध्द सुरू केलेल्या मोहिमेत किंवा स्पर्धेत आज शरद पवारांचा पराभव झाला आहे. आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीत जनता त्यावर शिक्कामोर्तब करते काय एवढाच प्रश्न शिल्लक आहे.

आजच्या घडामोडीनी एक बाब आणखी स्पष्ट झाली आहे की, अजितदादा त्यांच्या काही वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या प्रतिमेनुसार वाटतात तेवढे धश्चोट नाहीत. ते तेवढ्याच स्पष्टपणे राजकीय गोट्याही  फिरवू  शकतात हे आजच्या घडामोडीनी सिध्द झाले आहे. गेल्या काही दिवसात नितीशकुमार यांच्या पुढाकारामुळे पवारांच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची पिछेहाट झालीच होती, आता त्यांच्या महाराष्ट्रातील नेतृत्वालाही धक्का बसला आहे. कारण राष्ट्रीय राजकारणात नेहरू-गांधी  परिवाराचे जे स्थान होते ते महाराष्ट्राच्या राजकारणात पवार परिवाराचे होते. त्या स्थानाला आज जबरदस्त धक्का बसला आहे. कारण केवळ अजित पवार व त्यांच्या सहकार्यानीच नव्हे तर त्यांचे उजवे हात समजले जाणारे प्रफुल्ल पटेल यांनी  आणि  त्यांच्या पक्षाचे सरचिटणिस सुनील तटकरे यांनीही त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे उध्दव ठाकरेंवर ज्याप्रमाणे आदित्यला शेजारी बसविण्याची पाळी आली तशी आज पवारांवर नातू रोहित पवार यांना शेजारी बसवण्याची पाळी आली आहे. आपत्तीच्या एवढ्या गराड्यातही त्यानी आपले मनोधैर्य प्रयत्नपूर्वक टिकवून ठेवणे,, शून्यापासून पुनश्च हरिओम करण्याची तयारी दर्शविणे प्रशंसनीयच म्हणावे लागेल. त्यात अडचण एकच आहे व ती म्हणजे आज त्यांचे वय 83वर्षे आहे व अजितदादा साठीच्या आसपास आहेत.

या घडामोडीना केवळ महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणाच्या संदर्भातही महत्व आहे. कारण अजितदादानी आपल्या पत्रकार परिषदेतून पंतप्रधान मोदी यांच्या राजकारणाला निःसंदिग्ध पाठिंबा दिला आहे. किंबहुना त्या मुद्यावरूनच ही घडामोड घडली असल्याचे स्पष्ट केले आहे. अन्यथा ‘ हिंदुत्वनिष्ठ शिवसेनेशी जर आघाडी होऊ शकते तर भाजपेशी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण नव्हते. त्यावरून असे सूचित होते की, मोदींचे हात बळकट करण्याठी अजितदादानी हे पाऊल उचलले आहे.

तूर्त एवढेच बाकी आगे आगे देखो, होता है क्या?

ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर