मुंबई : अजित पवार यांनी काल भाजपसोबत हातमिळवणी केली. अशात राष्ट्रवादीचे नेते-कार्यकर्ते संभ्रमात होते. मात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना, जनतेला विश्वास देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. दरम्यान, या घटनेवर अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वेगळीच शंका उपस्थित केली आहे.
या राजकीय घडामोडीवर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, ‘मी काल माझी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन ते अडीच वर्ष जे काही राजकारण सुरू आहे. ते दिवसेंदिवस किळसवाणं होतं चाललंय. या नेत्यांना मतदारांशी काही घेणदेण नाही. मला असं वाटत आहे की या सर्वाचा विचार नागरिकाने करणे गरजेचे आहे. तर मी थोड्याच दिवसात मेळावा घेऊन याबाबत बोलणार आहे’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत.
तर ‘राष्ट्रवादीचे मोठे नेते असा निर्णय घेतील हे पटतं नाही, पवार साहेब काही म्हणत असले की माझा या घटनेशी काही संबध नाही तरीदेखील हे मोठे नेते पाठवल्याशिवाय जाणार नाहीत, उद्या सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तरीदेखील मला आश्चर्य वाटणार नाही’ असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.