‘ही’ मंडळी कुठेही जाणार नाहीत… नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

”महाराष्ट्र सरकारचे मुख्य लक्ष ड्रग्ज तस्करी संपुष्टात आणणे असून त्यावर सर्वांनी कठोर कारवाई करावी, असे आदेश मी दिले होते. गुन्हे नियंत्रण परिषदेतही मी याबाबत पोलीस प्रशासनाला निर्देश दिले होते. येत्या काही दिवसांत ड्रग्ज विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार असून त्यातील आरोपींनाही शोधून काढले जाईल,” असा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळण्यात येतील, असे संकेतच दिले आहेत. दरम्यान, नाशिकमधील ड्रग्ज प्रकरण उघड झाल्यानंतर राज्य सरकारने ड्रग्ज विरोधी मोहीम हाती घेतली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ”नाशिक येथील ड्रग्ज प्रकरणात आरोपी ललित पाटील फरार असल्याचे म्हटले जाते. परंतु, ही मंडळी कुठेही जाणार नाहीत, त्यांना पोलीस शोधल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचे सहकारीदेखील सापडले आहेत. गुन्हे नियंत्रण परिषदेत ड्रग्ज प्रकरणात पोलिसांच्या सर्व युनिट्सना कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले होते.”

”केंद्र सरकारच्यावतीने देखील या प्रकरणात लक्ष घालण्यात येत असून जिल्हानिहाय समित्यांचे गठन देखील करण्यात आलेले आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कारवायांवर लक्ष ठेवले जात आहे. येत्या काळातही अशाचप्रकारे ड्रग्ज विरोधात कारवाई सुरूच ठेवली जाईल,” असेही फडणवीसांनी म्हटले आहे. *