हुश्श्श.. उकाड्यापासून जळगावकरांना दिलासा! महाबळेश्वरपेक्षा जळगावचे तापमान कमी

जळगाव । मागील काही दिवसापासून ‘ऑक्टोबर हिट’च्या तडाख्याने हैराण झालेल्या जळगावकरांना दिलासा मिळू लागला आहे. हॉट सीटी म्हणून ओळख असलेल्या जळगाव शहरातील तापमान राज्यात सर्वात कमी नोंदवले गेले. बुधवारी या हंगामातील सर्वात कमी म्हणजेच रात्रीच्या १३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. यामुळे जळगावकरांना उकाड्यातून दिलासा मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील तापमान कमी होऊ लागले आहे. बुधवारी जळगाव शहराचे तापमान रात्री १३.२ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. जळगावपेक्षा महाबळेश्वरचे तापमान अधिक होते. महाबळेश्वरचे तापमान रात्री १६. ८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. राज्यात इतर ठिकाणी तापमान सरासरीच्या जवळपास होते.

एकीकडे आता जिल्ह्यातील तापमानात घट होऊन, गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे. मात्र, दिवाळीदरम्यान राज्यासह जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन वादळाची स्थिती. निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी अरबी समुद्रात ‘तेज’ हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. मात्र, या वादळाची दिशा ओमानकडे होती. त्यामुळे या वादळाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही.