जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचे दोन्ही हात कापल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये ही घटना घडलीय. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. सुशील भोईर (२७) असे जख्मी तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशील हा मुरबाड बारवी डॅम रोडने रिक्षाने जात होता. दरम्यान, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती श्रीकांत धुमाळ हे त्यांच्या सहकाऱ्यांसह कारने आले. त्यांनी रिक्षासमोर कार उभी करून ती थांबवली.
आरोपींनी सुशीलला जबरदस्तीने रिक्षातून बाहेर काढून जंगलात ओढले. सुशीलला प्रथम बेदम मारहाण करण्यात आली. यानंतर आरोपीने दोन्ही हात कापले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी आरोपी श्रीकांत धुमाळ, त्याचा मेहुणा अंकुश खारिक, नितीन धुमाळ व इतरांविरुद्ध मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक मुरबाडच्या आसपासच्या भागात आरोपींच्या शोधात घेत आहे.