हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महागणार ; व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 209 रुपयांची वाढ

मुंबई । आज 1 ऑक्टोबर रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमती जाहीर केल्या. यावेळी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 209 रुपयांची भरघोस वाढ केलीय. सणासुदीच्या काळात या वाढीचा फटका सर्व नागरिकांना बसणार आहे. मात्र, ही वाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात झाली आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर आहेत.

व्यावसायिक सिलिंडरचे नवे दर आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. या सिलिंडरच्या किमती वाढल्यानंतर मुंबईत 1,482 रुपयांवरून 1,684 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये खाणेपिणे महाग होऊ शकते. याआधी 1 सप्टेंबर रोजी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानंतर तेल कंपन्यांनी सिलिंडरचे दर १५८ रुपयांनी कमी केले होते.

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल नाही
ही दिलासादायक बाब आहे की 1 ऑक्टोबर 2023 रोजी तेल कंपन्यांनी केवळ व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसून त्याचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात केंद्र सरकारने देशभरातील सर्व कनेक्शनधारकांसाठी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 200 रुपयांची कपात करण्याची घोषणा केली होती. यानंतर घरगुती गॅस सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी करण्यात आली. आजही घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.