१५ हजारांच्या भंगारातून स्वत:च तयार केली कार

नंदुरबार : स्वप्न कोणतेही असेल, जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर ते कोणत्याही वयात पूर्ण करता येतं. अक्कलकुवा शहरातील लतिफखान दोसत्यारखान पठाण यांनी हे करून दाखवलंय. वयाच्या ६३ व्या वर्षीही अहोरात्र मेहनत घेत केवळ १५ हजारात खरेदी केलेल्या भंगारातून त्यानं आपल्या स्वप्नातील कार तयार केली आहे. या कारची सध्या अक्कलकुव्यात चर्चा आहे.

लतिफखान हे अक्कलकुव्यात डायनामा स्टार्टरचे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, वायरमन, वेल्डर, टर्नर आणि ड्रायव्हर असलेले लतिफखान यांचेही इतर सामान्य नागरिकांप्रमाणे स्वतःची एक कार असावी असे स्वप्न होते. परंतु गॅरेजमध्ये काम करून गाडी घेण्याएवढे पैसे येत नसल्याने त्यांनी स्वतच कार तयार करण्याचा निर्णय घेतला.

मोलगी नाका ते अक्कलकुवा शहर परिसरात फिरणारी ही गाडी पाहून अनेक जण तोंडात बोटे घालत आहेत. सध्या लतिफ खान हे यातून चर्चेचा विषय ठरत आहेत, अक्कलकुव्यातील मोटार गॅरेजमध्ये काम करणाऱ्या लतिफ खान यांने शिक्षण सातवीपर्यंत झाले आहे. १९७९ मध्ये शहादा येथील एक गॅरेजमध्ये काम शिकल्यानंतर १९८२ मध्ये ते सूरत येथे गेले होते. काही वर्ष सूरत शहरात काम केल्यावर अक्कलकुवा येथे आले.

याठिकाणी १५ वर्ष गाडीवर चालक म्हणून काम करुन पुन्हा गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या सर्व प्रवासात गाडी घेण्याचे स्पप्न अपूर्ण राहिल्याने गॅरेजमध्ये काम करतच त्यांनी खर्चाची जुळवाजुळव करत ही अनोखी चारचाकी गाडी तयार केली आहे. सध्या या गाडीच्या विविध परवानग्या तसेच सीएनजी इंधनासाठी टाकीचे काम शिल्लक आहे. लवकरच गाडीवर हूड बसवून ते तिला वापरात आणणार आहेत.

या साधनांचा वापर
लतिफ खान यांनी १५ हजार रुपयात टू व्हिलरचे सेल स्टार्ट इंजिन, स्कूटरचे चार सेकंड हँड टायर, व्हॅनचे पॉवर बॉक्स, पाच गेअर व रिव्हर्स बॉक्सची जुळवाजुळव करत गॅरेजमध्ये काम करत सहा महिन्यात विना हुडवाली चारचाकी गाडी तयार केली. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या स्पेअर पार्टचा वापर करून त्यांनी ही कार तयार केली आहे.