२,००० रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी आज शेवटची संधी

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। मे महिन्यामध्ये सरकारने २,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. या नोटा बँकांमध्ये जमा करण्यासाठी आणि बदलण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तुमच्याकडे जर २,००० रुपयांची नोट असेल तर आजच बँकेत जाऊन बदलून घ्या. रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेली मुदत आज शनिवारी संपत आहे.

सेंट्रल बँकेने स्पष्ट सांगितले आहे की लोकांना २,०००  रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी जास्त वेळ मिळणार नाही. आज नोटा जर  बदलल्या नाहीत तर उद्यापासून त्यांची किंमत कागदाच्या तुकड्यासारखी होईल.  रिझर्व्ह बँकेने हे स्पष्ट केले आहे की ती २,००० रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत वाढवणार नाही. अशा परिस्थितीत तुमच्याकडे २,००० रुपयांच्या नोटा बदलण्याची शेवटची संधी आहे.

३० सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट बँकांमध्ये जमा करता येणार नाही किंवा तिची देवाणघेवाणही करता येणार नाही. या मुदतीनंतर ती फक्त रिझर्व्ह बँकेतून बदलून घेता येऊ शकेल. मात्र, यासाठी तुम्ही नोटा वेळेत का जमा केल्या नाही किंवा बदलून घेतल्या नाहीत, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.